संगणकाप्रमाणे स्मार्टफोन असेंबल करता येईल यावर आपला विश्वास बसणार नाही. मात्र फेअरफोन कंपनीने ही सुविधा आता उपलब्ध करून दिली आहे.
बाजारात उत्तमोत्तम कंपनीचे संगणक मिळत असतांना बरेच जण स्वत: याला सुटे भाग घेऊन असेंबल करण्यास प्राधान्य देत असतात. यात आपल्याला हव्या त्या प्रतीचे विविध भाग लावता येतात. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे ‘कॉन्फिग्युरेशन’ हवे असतांना हा पर्याय अतिशय उत्तम मानला जातो. याच पध्दतीने आपल्याला हव्या त्या फिचर्सचा स्मार्टफोन तयार करण्याची सुविधा देण्यासाठी अनेक कंपन्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यात गुगलच्या बहुचर्चीत ‘प्रोजेक्ट एरा’चाही समावेश आहे. अनेक कंपन्यांनीही अनेक वर्षांपासून यावर काम सुरू केले असून यात फेअरफोनचा समावेश आहे. आता याच कंपनीने फेअरफोन टू हे याच प्रकारातील मॉडेल सादर केले आहे.
फेअरफोन टू मध्ये मध्यमश्रेणीच्या स्मार्टफोनचे फिचर्स दिलेले आहेत. यात पाच इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. याची रॅम दोन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी इतके दिलेले आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईडच्या लॉलिपॉप या आवृत्तीवर चालणारा आहे. याचे सर्व सुटे भाग अगदी कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक कौशल्याविना एकत्र करून स्मार्टफोन तयार करता येतो. यासाठी अगदी सोल्डरिंगही करावी लागत नाही. अर्थात कुणीही सहजपणे याचे सर्व सुटे भाग एकत्र करून स्मार्टफोन तयार करू शकतो. मात्र हा बराचसा महागडा आहे. बाजारपेठेत हे फिचसर असणारा स्मार्टफोन किफायतशीर दरात मिळत असतांना याचे मुल्य तब्बल ५३० युरो अर्थात फ्लॅगशीप मॉडेलइतके ठेवण्यात आले आहे.