या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

वाचावे असे काही





पाठीवरचे जड झाले ओझे!
sacमुलांच्या पाठीवरील ओझ्याबाबत दिल्ली उच्च न्यायलयाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलेय. त्यामुळे पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आलाय. दप्तरातल्या ज्या गोष्टींमुळे मुलांचे ‘शिकणे’ होते, असे मोठ्या संख्येने पालक, शिक्षक आणि एकूणच समाज मानत आलाय. मग त्या दप्तराला ओझे तरी का म्हणायचे?
ओझे ही बाब तशी व्यक्तीसापेक्ष असते. याकडे केवळ मोठ्यांच्या नजरेने पाहता येणार नाही. शहरी आणि ग्रामीण भागातल्या मुलांच्या दप्तरात फरक असला तरी त्याचा आकार आणि भार वाहायला लागणे ही कॉमन गोष्ट सांगता येईल.
मुलांचे दप्तर उघडले की, त्यात पाठ्यपुस्तके, वह्या, जेवणाचा डब्बा, पाण्याची बाटली. सहा मुख्य विषयांची पुस्तके, खासगी प्रकाशकांची वर्कबुक्स, सर्व विषयांच्या वर्गपाठ-गृहपाठाच्या २००-२०० पानी वह्या. निबंधाच्या वह्या. कंपासपेटी, निरनिराळ्या रंगपेट्या. गोट्या, खडे, चेंडू आणखीन खेळणी असे काय वाट्टेल ते घेऊन मुलं शाळेत येतात. याशिवाय शाळा भरण्याआधी किंवा सुटल्यावर खेळाचा सराव असल्यास त्याचे निराळे ड्रेस आणि साहित्यही आणावे लागते. शाळा सुटल्यावर लगेच क्लास असल्यास त्याच्या वह्या सोबत असतात. उपयुक्तता न तपासता हे ओझे मुलांनी भारवाही असल्यासारखे विनातक्रार वाहायचे!
आपल्याकडेचे पालक सतत ‘कस्टोडीयन’च्या भूमिकेत असतात. मुलांचे भलेबुरे आपल्यालाच कळते, अशी त्यांची ठाम समजूत असते. शाळेचे माध्यम, शाळा निवडण्यापासून, अगदी मुलांचे मित्र ठरवण्यापर्यंतची सगळी कामे पालक मनोभावे करत राहतात! शहरांत शाळा लांबवर असतात. शाळेत जाता-येता स्टेशन, बस/रिक्षा स्टॉपपर्यंत दप्तराचे ओझे वाहताना मुलांचा पिट्टा पडतो. ती केविलवाणी होऊन जाताहेत. ग्रामीण भागात तुलनेने पाठीवरचे ओझे कमी असले तरी आजही अनवाणी काही मैलांची पायपीट बिचाऱ्या मुलांना करावी लागतेय.
दप्तर वागवायला सगळीकडे सॅक बॅगांची फॅशन आलीय. त्यांचे ओझे ज्या तऱ्हेने पाठीवर लादले जातेय. त्यातून कोवळ्या वयातल्या मुलांच्या पाठीचा कणा, संबंधित हाडे, मानेचे, मेंदूचे आणि इतर स्नायू यांच्यावर आणि एकूणच शरीराच्या वाढीवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे परिणाम संभवतात. मुलांच्या पाठीवरील ओझ्याचा आपल्या देशात शास्रशुद्ध अभ्यास झाल्याचे दिसत नाही. पाश्चात्य देशांत असे अभ्यास झालेत. ते वाचताना आपली मुलं किती सोशिक आहेत, याची खात्री पटते. मुलांची दया येते!
हे ओझे वाढते कसे? याचा विचार केल्यावर लक्षात येते की, याची मूळं शिक्षण पद्धतीत आहेत. ‘दप्तर जितके फुगलेले, तितके शिक्षण चांगले,’ असा पालकांचा खास समज दिसतोय. शिक्षण हक्क कायद्यामुळे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन(CCE) आले. रचनावादी विचारसरणी आल्यावर घोकांपट्टीवर बेतलेल्या ‘पारंपारिक’ परीक्षांचे अवाजवी महत्त्व कमी होईल असे वाटले होते. निदान आज तरी तसे झालेले दिसत नाही. बरं, परीक्षा कशाची? केवळ स्मरणावर आधारित लिखाणाची! जगाच्या स्पर्धेत टिकायचे तर मुलांना लिहायचा भरपूर सराव द्यायला हवा. त्यासाठी घरचा अभ्यास करून घ्यायला हवा. म्हणजे चांगले गुण मिळतील, हे पालकांच्या मनावर पक्के बिंबलेय.(किंवा खासगी प्रकाशकांनी तरी बिंबवलेय!) यात खटकणारी एक गोष्ट म्हणजे स्पर्धात्मक गोष्टींची तयारी करून घेताना मुलांवर प्रचंड अविश्वास दाखविलेला असतो. करून पाहण्यापेक्षा, समजून घेऊन वाचण्यापेक्षा लिहिण्यालाच जास्त महत्त्व दिले जातेय. त्यातून घरच्या अभ्यासाचे ‘महत्त्व’ वाढले. या सतराशे साठ वह्या पालक शिक्षकांच्या डोळ्यांना सुखावतात! ओझे मात्र वाढत जाते.
‘भरपूर घरचा अभ्यास द्या’ या पालकांच्या अट्टाहासाला, आग्रहाला शाळा आणि शिक्षक बळी पडतात. याविषयी ते कोणतीच स्पष्ट भूमिका घेत नाहीत. पटसंख्येत घट होण्याची भीती त्यांच्या मनात घर करून बसलेली असते. बरं मुलांना मताला अजिबात किंमत नसते. त्यामुळे पालकांची थेरं शाळा सहन करत राहतात. त्यात मुलांची भारी पिळवणूक होते. खरे तर ‘घरचा अभ्यास’ त्यायोगे वाढणारे ओझे ही मुलांचा शिकण्यातला आनंद हिरावून घेणारी बाब आहे. वर्गात एखादा पाठ शिकल्यावर तोंडी प्रश्न विचारले जातात. पाठाखालील प्रश्नोत्तरे घरून लिहून आणायला सांगितली जातात. पुन्हा गृहपाठाच्या वहीतही तेच सेम टू सेम कॉपी करायचे..! ते एक रुटीन वर्क होऊन जाते. नवे काही शिकायला मिळत नसल्याने अभ्यासातला आनंदच मावळत जातो. दशमान पद्धती कशाला म्हणतात? याचा गंध नसलेल्या पूर्व प्राथमिक वर्गांतल्या विद्यार्थ्यांना शाळा सुटताना १ ते १०० लिहायला सांगितले जाते! हे सक्तीने लिहायला लावणे म्हणजे मुलांचा छळ आहे. यातून मुलांचे शिकणे सोडा उलट त्यांच्या मनावर प्रचंड मानसिक दडपण वाढत जाते. घरच्या अभ्यासात मुलांच्या ठायी असलेल्या ऊर्जेला सकारात्मक वळण देणारे, छंद जोपासनेला, सर्जनशीलतेला, कल्पकतेला, निरीक्षण शक्तीला, विश्लेषक वृत्तीला खतपाणी घालणाऱ्या प्रयोगशील गोष्टींचा अभाव असतो. गृहपाठ, वर्गपाठ, निबंध, स्वाध्यायपुस्तिका, प्रकल्प यातून दप्तराचे ओझे आणि आकार दोन्ही वाढत जाते. त्या रुक्ष कंटाळवाण्या गोष्टी शिकण्यापासून मुलांना मनाने दूर नेतात.
तीच ती गोष्ट करायला मुलांनाच काय कोणत्याच व्यक्तीला आवडत नाही. अजिबात कल्पकता नसल्याने ‘घरचा अभ्यास’ पालकांना प्रिय असला तरी अनेक मुलांच्या दृष्टीने ती अत्यंत अप्रिय आणि भयंकर गोष्ट बनून राहिली आहे! सांगता येईना आणि सहन होईना असा मामला आहे. शाळेतून आल्यावर खेळण्या-कुदण्याऐवजी मुलं वह्या, पुस्तके घेऊन खाली मान घालून खर्डेघाशी करत बसतात, तेव्हा पालकांच्या चेहऱ्यावर केवढे समाधान विलसत असते! समजलेले नसताना गणितातले उदाहरणसंग्रह सोडवणे अनेक मुलांसाठी निरस आणि कंटाळवाणा भाग असतोच. याशिवाय मनावरचे दडपण वाढवणारी गोष्ट असते. घटक समजो न समजो लिहीत बसणे, पाने रंगवणे म्हणजे अभ्यास. पुन्हा दुसऱ्या दिवशी वह्या न विसरता शाळेत आणणे. तपासून घेणे, असे सारे इमानेइतबारे सुरू असते. परंतु या अभ्यासाव्यतिरिक्त मुलांचं उमलणं, फुलणं असतं. हा भारंभार अभ्यास म्हणजे त्या फुलातली केवळ एक पाकळी असते, हे पालकांना आणि शाळांनाही उमजेल तो सुदिन, अशी एकूण स्थिती आहे. म्हणूनच ओझ्याकडे केवळ किलोग्रॅमच्या भाषेत बघता येत नाही. पाठीवरच्या ओझ्यासोबत मनावरच्या ओझ्याबाबत बोलावेच लागते. कारण अशा तऱ्हेने तयार झालेली मुलं भविष्यात समस्यांचे निराकरण करु शकतीलच याची हमी देता येत नाही. शिक्षक शिकवताना कळत नाही, हे पण ओझेच असते! याचाही मनावर खोलवर परिणाम होतो. कालांतराने या अशा मुलांचं देशाला ओझे होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या सगळ्यात शिक्षणशास्र धाब्यावर बसवले जातेय. रचनावादी तत्त्वही नापास होतेय. धुरीणांनी याकडे अधिक गंभीरपणे पाहायला हवे.
शहरी इंग्लिश शाळांत होमवर्कचे प्रचंड स्तोम माजवले गेलेय. जी शाळा जास्त अभ्यास देते, ती चांगली शाळा मानली जातेय! दिल्लीतल्या पब्लिक स्कूलमध्ये पाहिली दुसरीच्या मुलांच्या पाठीवर ४ किलोपेक्षा जास्त ओझे असते, असे निरीक्षण ‘ओझ्याविना शिक्षण’ (Learning without burden) या प्रो. यशपाल यांच्या नेतृत्वाखालील अहवालाने १९९३ मध्ये नोंदवले आहे. आजही इयत्तांची शिडी मुलं जशीजशी चढत जातात, तसतसे ओझे कमी होण्याऐवजी वाढतेच आहे. हे आजचे भयंकर वास्तव आहे. ज्या शाळांना हे दप्तर मुलांपेक्षाही जास्त ‘लाडके’ असते ते शाळांच्या बेंचेसमध्ये मावत नाही! दप्तर शेजारी घेऊन मुलांना दिवसभर अवघडल्यासारखे बसावे लागते. कंबरदुखी, पाठदुखी सुरू होते. वर्गात गर्दी असेल विचारू नका. सगळा आनंदीआनंद!
अलीकडे बाजारात मोठमोठ्या आकाराच्या वह्या (Long Book) आल्यात. लहान वह्या हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. विषयवार गृहपाठ, वर्गपाठ, प्रत्येकी २०० पेजेस वही. निबंध, स्वाध्याय पुस्तिका वेगळे. यांचे ओझी वाहायला मुलं म्हणजे गाढवं नाहीत, ही साधी गोष्ट मुलांच्या हितचिंतकांच्या गावी नसते? याला काय म्हणावे? मुलं, शिक्षक, पालक यांना जोडणारा पाठ्यपुस्तकसदृश सामाईक धागा असावा. पण सर्व मुलांनी रोज सर्व विषयांची पुस्तके आणायलाच पाहिजेत का? याचा विचार करून पाठ्यपुस्तकांच्या जोखडातून शिक्षण सोडवायला हवे. एका बेंचवर बसलेले दोन विद्यार्थी विषयांची पुस्तके दोघांत सहज शेअर करु शकतील. त्यातून सहकार्याची भावना वाढीस लागेल. जिल्हा परिषदेच्या काही शाळा दप्तरमूक्त झाल्यात. माध्यमिक शाळांतही हे शक्य आहे. कडाप्प्याच्या रॅक बनवून दप्तरं ठेवता येतील.
ओझे कमी करायचे म्हणून प्राथमिक स्तरावर परिसर अभ्याससारखे विषय एकात्मिक पद्धतीने शिकवायला घेतले. बालभारतीची पुस्तके बदलत आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. परंतु चित्रमयता आणणे, मोठ्या टाईपमध्ये लिहिणे, सुटा मजकूर देणे, हे बदल करताना पुस्तकांचाही आकार मोठा झालाय. चौथीच्या विज्ञानाच्या पुस्तकाकडे उदाहरण म्हणून पाहता येईल. बालभारतीने काही विषयांची दोन पुस्तके (भाग १, भाग २) बनवायला हरकत नाही. २०० पानांच्या मोठ्या वह्यांऐवजी १०० पानांच्या लहान वह्या वापरणे शक्य आहे. एक वही संपली की दुसरी करता येईल. लिहिण्यावरचा फोकसदेखील बदलायला हवा. यात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सुटी असली की ‘भरपूर अभ्यास द्या’ असे म्हणत मुलांच्या उत्साहावर विरजण टाकणारी मानसिकता बदलावी लागेल, यात मुलांचे सौख्य सामावलेले नाही.
(सदर लेख दैनिक सकाळ मधून साभार.)
भाऊसाहेब चासकर,
मोबाईल - + 91 9881152455,
"माहेर", रतनगड सोसायटी, नवलेवाडी, ता. अकोले, जि. अहमदनगर. [महाराष्ट्र]