
केंद्र सरकारने संगणक व स्मार्टफोनसाठी मोफत अँटी व्हायरस टुल्स देण्याची घोषणा केली असून कुणीही युजर याचा उपयोग करू शकतो. हे टुल्स कसे वापरावेत याची ही सुलभ माहिती !
केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ‘बॉटनेट’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत देशातील संगणक, लॅपटॉप आणि स्मार्टफोन युजर्ससाठी मोफत सुरक्षा प्रणाली पुरवण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या ‘डिजीटल इंडिया’ या मोहिमेच्या अंतर्गत ‘सी-डॅक’ने याला विकसित केले आहे. यात ‘सायबर स्वच्छता केंद्र’ या नावाने एका वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले आहे. देशातील ५८ इंटरनेट सर्व्हीस प्रोव्हायडर आणि १३ बँकांनी यासाठी सरकारसोबत सहकार्याचा करार केला आहे. या अंतर्गत कुणाही युजरच्या संगणकात व्हायरस अथवा मालवेअर आढळून आल्यास त्याला तातडीने एक अलर्ट पाठविण्यात येऊन त्याच्या निर्मूलनासाठी लिंक पाठविण्यात येईल. तसेच या लिंकवर खालीलप्रमाणे विविध टुल्स देण्यात आले आहेत.
१) बॉट रिमूव्हल टुल:- क्विक हिल या सायबर सुरक्षा क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे. याच्या मदतीने कुणीही आपल्या संगणकात असणारा ‘बॉट’ (जो फिशींग ई-मेल, फेक लिंक आदींच्या माध्यमातून संगणकात शिरलेला असतो!) सुलभपणे बाहेर काढू शकतो. ३२ आणि ६४ बीटसाठी याला स्वतंत्रपणे डाऊनलोड करण्याची सुविधा यात देण्यात आली आहे. एकदा या लिंकवरून कुणीही याला डाऊनलोड केल्यानंतर ‘क्विक स्कॅन’, ‘फुल स्कॅन’ आणि ‘कस्टमाईज्ड स्कॅन’ असे यात तीन पर्याय दिलेले आहेत. यात आपल्याला हव्या त्या पध्दतीने स्कॅन करून आपण आपला संगणक ‘बॉट’मुक्त करू शकतो. विशेष बाब म्हणजे या प्रक्रियेत संगणकावर संबंधीत प्रोग्रॅम इन्टॉल करावा लागत नाही. कुणाही युजरला हव्या त्या वेळेस तो ‘रन’ करता येतो. आणि तो संगणकात आधीच असणार्या ‘अँटी व्हायरस’सोबत वापरणे शक्य आहे. विंडोज प्रणालीवर चालणार्या कुणाही संगणकावर याचा वापर करता येतो.
खालील लिंकवर क्लिक करून कुणीही याचा वापर करू शकेल.
http://www.quickheal.co.in/bot-removal-tool
२) युएसबी प्रतिरोध :- हे टुल ‘सी-डॅक’ने विकसित केले आहे. अलीकडच्या काळात पेन ड्राईव्हसारख्या युएसबी ड्राईव्हचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सुलभ स्टोअरेजसाठी युएसबी अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. मात्र याचा तोटादेखील आहे. एक तर याच्या माध्यमातून आपल्या संगणकात व्हायरस, मालवेअर आदी घातक बाबी सहजगत्या प्रवेश करू शकतात. आणि याचसोबत याच्या मदतीने कुणीही आपल्या संगणकातील महत्वाची माहिती चोरून नेऊ शकतो. नेमका यालाच प्रतिबंध घालण्यासाठी ‘युएसबी प्रतिरोध’ हे टुल सादर करण्यात आले आहे. विंडोज ७ आणि १० या आवृत्तींवर चालणार्या संगणकात याचा वापर करता येणार आहे. एकदा याला संगणकावर इन्टॉल केल्यानंतर संबंधीत युजर युएसबीला पासवर्डने संरक्षित करू शकतो. अर्थात त्याच्या शिवाय कुणीही अन्य व्यक्ती त्याच्या संगणकाला युएसबी ड्राईव्ह लाऊन माहिती मिळवू शकत नाही. यासोबत युएसबीच्या माध्यमातून संगणकात शिरणार्या व्हायरस आणि मालवेअर्सलाही अटकाव करता येतो. हे टुल खालील लिंकवर उपलब्ध आहे.
खालील लिंकवर क्लिक करून कुणीही याचा वापर करू शकेल.
https://cdac.in/usbpratirodh
३) ऍपसंविद:- विंडोज प्रणालीवर चालणार्या संगणकासाठी हे ‘डेस्कटॉप ऍप्लिकेशन’च्या माध्यमातील सुरक्षाविषयक टुल आहे. याचा वापर करून कुणीही आपल्या संगणकावर त्या युजरला हव्या असणार्या फाईल्स आणि प्रोग्रॅमचा वापर करू शकतो. अर्थात याचे काम पारंपरिक अँटीव्हायरसच्या अगदी विरूध्द आहे. यात युजर हा ‘ट्रस्टेड’ फाईल्स आणि प्रोग्रॅम्सलाच आपल्या संगणकावर ‘रन’ करू शकतो. यात अपडेटची सुविधा देण्यात आली असून पासवर्डच्या मदतीने आपल्या संगणकाचा इंटरफेस सुरक्षित करण्याची सुविधादेखील यात असेल.
खालील लिंकवर क्लिक करून कुणीही याचा वापर करू शकेल.
https://cdac.in/appsamvid
४) एमकवच- स्मार्टफोनसाठी हे खास टुल तयार करण्यात आले आहे. अँड्रॉईड प्रणालीवर चालणार्या स्मार्टफोनवर याचा वापर करता येतो. यात स्मार्टफोनमध्ये पासवर्डसह अन्य महत्वाची माहिती चोरणारे व्हायरस, मालवेअर्सला अटकाव करता येतो. याशिवाय यात वाय-फाय, स्मार्टफोनचा कॅमेरा, ब्ल्यु-टुथ, मोबाईल डेटा आदींच्या माध्यमातून हल्ला करणार्या जावास्क्रिप्ट मालवेअर्सपासून संबंधीत स्मार्टफोनचे संरक्षण करता येते. यात युजरला नको असणारे कॉल अथवा एसएमएस ब्लॉक करण्याची सुविधाही आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्मार्टफोन हरवला अथवा चोरीस गेल्यास त्यातील कॉल-लॉगसह अन्य महत्वाची माहिती दुरूनच ‘इरेज’ करण्याची सुविधा यात देण्यात आली आहे. तसेच यात सुलभपणे डेटा बॅकअप/रिस्टोअर करता येणार असल्यामुळे अशा स्थितीत त्या स्मार्टफोनमधील महत्वाच्या माहितीचा दुरूपयोग टळू शकतो. या टुलची माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे.
खालील लिंकवर क्लिक करून कुणीही याचा वापर करू शकेल.
https://cdac.in/mkavach
* एमकवच हे स्मार्टफोन ऍप्लीकेशन आपण गुगल प्ले स्टोअरवरून खाली लिंकवर क्लिक करून इन्टॉल करू शकतात.
https://play.google.com/store/apps/details?id=org.cdac.mkavach
५) ब्राऊजर जेएसगार्ड:- इंटरनेट ब्राऊजरच्या माध्यमातून होणार्या सायबर हल्ल्यांचा प्रतिकार करण्यासाठी फायरफॉक्स आणि क्रोम या ब्राऊजर्सच्या एक्सटेन्शनच्या माध्यमातून हे टुल प्रदान करण्यात आले आहे. याच्या मदतीने एचटीएमएल/जावा स्क्रीप्ट मालवेअर्सला अटकाव करता येतो. संबंधीत युजर धोकादायक वेबपेजला व्हिजीट करत असतांना याबाबत अलर्ट देऊन त्याला सावध करण्यात येते. तसेच कोणते वेबपेज हे सुरक्षित आहे? याची माहितीदेखील युजरला देण्यात येते.
खालील लिंकवर क्लिक करून कुणीही याचा वापर करू शकेल.
https://www.cdac.in/index.aspx?id=cs_eps_jsguard
* याच्या डाऊनलोड लिंक खालीलप्रमाणे आहेत.
Firefox Browser
https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/browser-jsguard
Google Chrome Browser
https://chrome.google.com/webstore/detail/browserjsguard/ncpkigeklafkopcelcegambndlhkcbhb