महिलांचे मोबाईल क्रमांक हे काही रिचार्ज करणारे विक्रेते इतरांना विकत असल्याच्या पार्श्वभूमिवर व्होडाफोनने मोबाईल क्रमांक न सांगतांनाही रिचार्ज करण्याची सुविधा प्रदान केली आहे.
महिलांचे मोबाईल क्रमांक हे काही रिचार्ज करणारे विक्रेते इतरांना विकत असल्याचा धक्कादायक प्रकार अलीकडेच उत्तर भारतात आढळून आला होता. यात ते सुंदर तरूणीच्या क्रमांकांना वाढीव पैसे आकारत असल्याचे उघड झाले होते. यातून मोबाईल क्रमांकाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यावर उपाययोजना म्हणून व्होडाफोनने मोबाईल क्रमांक न सांगतांनाही रिचार्ज करण्याची सुविधा प्रदान केली आहे.
व्होडाफोनने यासाठी ‘प्रायव्हेट रिचार्ज मोड’ म्हणजेच ‘पीआरएम’ ही नवीन सेवा सुरू केली आहे. यासाठी १२६०४ या क्रमांकावर ‘Private’ असे टाईप करून एसएमएस पाठवायचा आहे. विशेष म्हणजे हा क्रमांक ‘टोल फ्री’ असल्यामुळे या एसएमएससाठी कोणतीही आकारणी करण्यात येणार नाही. तसेच मोबाईलमध्ये बॅलन्स नसला तरी एमएमएस पाठविता येईल. यानंतर त्या मोबाईल क्रमांकावर एक ‘वन टाईम पासवर्ड’ म्हणजेच ‘ओटीपी’ पाठविण्यात येईल. हा ओटीपी क्रमांक मोबाईल रिचार्ज करणार्या विक्रेत्याला दिल्यानंतर तो हव्या त्या रकमेचे रिचार्ज करेल. यासाठी त्या विक्रेत्याला मोबाईल क्रमांक सांगण्याची गरजदेखील उरणार नाही. व्होडाफोनने प्रारंभी पश्चिम बंगालमध्ये ‘प्रायव्हेट रिचार्ज मोड’ ही सेवा लॉंच केली असून येत्या काही दिवसांमध्ये भारतातील अन्य सर्कल्समध्येही याला सुरू करण्यात येणार आहे.
*techvarta*