पेटीएम या कंपनीने आता आपली ऑफलाईन सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून आता कुणीही इंटरनेट नसतांनाही याचा उपयोग करू शकेल.
नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वाधीक लाभ ऑनलाईन पेमेंट प्रणाली आणि मोबाईल वॅलेटला झालेला आहे. यात अर्थातच पेटीएम अग्रेसर आहे. नोटाबंदीनंतर या कंपनीनेही अत्यंत आक्रमकपणे मार्केटींग केल्यामुळे या कंपनीच्या युजर्सच्या संख्येच प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. मात्र मोबाईल वॅलेट वापरण्यातील प्रमुख अडचण म्हणजे भारतातील अनेक लोकांकडे अद्यापही स्मार्टफोन आणि पर्यायाने इंटरनेटची सुविधा नाही. यामुळे अनेक जण इच्छा असूनपही पेटीएम वापरू शकत नाहीत. या पार्श्वभुमिवर पेटीएमने आता ऑफलाईन पेमेंट प्रणालीचा मार्ग पत्करला आहे. यासाठी कंपनीने १८००-१८००-१२३४ ही स्वतंत्र क्रमांक जाहीर केला आहे. हा क्रमांक ‘टोल फ्री’ असेल. यावर कॉल करून व्यापारी आणि ग्राहक यांच्यात सुलभपणे पैशांची देवाण-घेवाण करता येईल. याचा वापर करण्यासाठी व्यापारी आणि ग्राहकाला आपला मोबाईल क्रमांक पेटीएमकडे नोंदणीकृत करून चार आकडी पीन क्रमांक मिळवावा लागेल. यानंतर कुणीही सहजगत्या ज्याला पैसे पाठवायचे आहे त्याचा क्रमांक आणि रक्कम भरून ती रक्कम संबंधीत व्यक्तीला ‘ट्रान्सफर’ करू शकेल. यामुळे साधे मोबाईल असणारेही पेटीएमचा वापर करू शकतील. यात काही अडचण आल्यास वर नमुद केलेल्या क्रमांकावर कॉल करून व्यवहार पूर्ण करण्यात येईल. या सुविधेच्या मदतीने मोबाईल चार्जिंगही शक्य असल्याचे पेटीएमने जाहीर केले आहे.