जीमेलवर सध्या आपल्या जुन्या फाईलच्या नावांशी साधर्म्य असणार्या फाईल्स पाठवून ते अकाऊंट हॅक करण्याचा प्रकार सुरू झाला असून अशा ई-मेल्सवर क्लिक करू नका असा इशारा सायबरतज्ज्ञांनी दिला आहे.
अलीकडच्या काही दिवसांमध्ये हॅकर्सनी जीमेलमधून माहिती चोरी करण्यासाठी नवीन तंत्र अवलंबले असल्याचे दिसून आले आहे. या अंतर्गत कुणाही जीमेलधारकाला त्याच्या एखाद्या जुन्या फाईलच्या नावाने अटॅचमेंट पाठविण्यात येते. यामुळे संबंधीत जीमेल वापरणारा विश्वासाने त्यावर क्लिक करतो. यानंतर संबंधीत युजरला खाली दर्शविल्यानुसार लॉगीन करण्याचे सुचविण्यात येते. हे पेज हुबेहूब जी-मेलच्या लॉगीन प्रमाणेच दिसत असते. मात्र बारकाईने याच्या अॅड्रेस बारवर पाहिले असता ही दुसरीच साईट असल्याचे आपल्याला दिसून येते.

मात्र युजर फसून त्यात माहिती टाकतो. यानंतर याच माहितीच्या आधारे त्याचे जीमेल अकाऊंट हॅक करत यातील माहितीच्या आधारे अन्य जीमेलधारकांना हॅक केले जाते. ही बाब सर्वप्रथम ‘वर्डफेन्स’ या वर्डप्रेस सिक्युरिटी प्लगीनचे सीईओ मार्क माऊंडर यांना आढळून आली आहे. त्यांनी जीमेल युजर्सला अशा स्वरूपाच्या लिंकवर क्लिक करून माहिती न भरण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय जीमेल अधिक सुरक्षित करण्यासाठी ‘टु-स्टेप-व्हेरिफिकेशन’ या प्रणालीचा वापर करण्याचेही त्यांनी सुचविले आहे. आपण अद्यापही ही प्रणाली कार्यान्वित केलेली नसेल तर येथे क्लिक करून याला अॅक्टीव्हेट करू शकतात.