अखेर मायक्रोसॉफ्टने आपले नवीन ऑफीस अॅप अँड्रॉईडवर मोफत सादर करण्याची घोषणा केली आहे. आधी हे अॅप आयओएस व विंडोजवर होते.
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे ऑफीस टुल्स मोठ्या प्रमाणात वापरले जातात. आपण संगणकावर वर्ड, पॉवर पॉईंट, एक्सेल आदींचा मुक्त वापर करतो. स्मार्टफोनचा विचार करता विंडोज आणि आयओएस प्रणालीवर हे अॅप उपलब्ध होते. अँड्रॉईडवर हे अॅप येणार असल्याची कधीपासूनच चर्चा होती. या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात अँड्रॉईड टॅब्लेटवर ते सादर करण्यात आले होते. यानंतर पाच आठवड्यांपुर्वीच मायक्रोसॉफ्टने बीटा व्हर्शनमध्ये अँड्रॉईडवर ऑफीस अॅप सादर केले होते. यात जगभरातल्या डेव्हलपर्सकडून आलेल्या सुचनांचा विचार करून आता गुगल प्ले स्टोअरवर मायक्रोसॉफ्ट ऑफीस अखेर दाखल झाले आहे. विशेष बाब म्हणजे ते अगदी चकटफू उपलब्ध आहे.
अँड्रॉईडवर ऑफीस सुट आल्यामुळे आपण वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंट फाईल्स ओपन, एडीट वा सेव्ह करू शकतो. याचसोबत वनड्राईव्ह, ड्रॉपबॉक्स, गुगल ड्राईव्ह आदींवर ते स्टोअरही करू शकतो. हे ऍप संगणकावर वापरण्यासाठी मात्र आपल्याला ‘ऑफीस ३६५’ची सेवा घेण्याची अट टाकण्यात आली आहे. अँड्रॉईडवर किटकॅट अर्थात ४.४ आणि त्यापुढील व्हर्शनवर हे अॅप चालणार आहे.