व्हाटसअॅप, हाईक, व्हायबर, फेसबुक मॅसेंजर, वुईचॅट आदींसारखे मॅसेंजर एकाच ठिकाणी वापरण्याची सुविधा देणारे ‘एन-गेज’ हे अॅप सध्या लोकप्रिय झाले आहे.
आज मॅसेंजर मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये एकापेक्षा जास्त मॅसेंजर असल्याचे आपल्याला आढळून येत आहेत. यातील प्रत्येक मॅसेंजर हा आपल्याला स्वतंत्रपणे वापरावा लागतो. मात्र हे सर्व मॅसेंजर एकच ठिकाणी वापरण्याची सुविधा मिळाल्यास काय धमाल होईल! असे आपल्याला नेहमी वाटत असते. आता नेमकी याच प्रकारची सुविधा देणारे ‘एन-गेज’ हे अॅप सादर करण्यात आले आहे. हे लाईफस्टाईल चॅट अॅप आहे. यात अन्य मॅसेंजरप्रमाणे चॅटींग, ग्रुप तयार करणे, सामूहिक संदेश पाठविणे वा कॉलिंग करणे आदी फिचर्स देण्यात आलेले आहेत. यात विपुल प्रमाणात इमोजी, स्टीकर्स आदींना देण्यात आले आहे. यात कुणीही पर्सनलाईज्ड स्टीकर्स, डुडल्स, इमोजी, पोस्टर आदी तयार करून आपल्या मित्रांना पाठवू शकतात.
मात्र लक्षणीय बाब म्हणजे यात ‘क्रॉस प्लॅटफॉर्म’ या पध्दतीने दुसर्या अन्य मॅसेंजरवर संदेश पाठविणे वा कॉल करणे शक्य आहे. उदाहरणार्थ मी ‘एन-गेज’ ऍप वापरत असून मला व्हाटसऍप वापरणार्या माझ्या मित्राला संदेश पाठवायचा आहे. त्या मित्राने ‘एन-गेज’ इन्स्टॉल केले नसेल तरीही मला त्याला संदेश पाठविता येईल अथवा त्याला कॉल करता येईल. याच प्रकारे व्हाटसऍप, हाईक, व्हायबर, फेसबुक मॅसेंजर, वुईचॅट, गुगल प्लस आदींवर संदेश पाठविता येतात. सुरक्षेच्या दृष्टीने विचार करता हे अॅप अतिशय उच्च दर्जाचे आहे. यातून ‘एनक्रिप्टेड’ संदेशांची देवाण-घेवाण करता येते. सध्या अँड्रॉईड, आयओएस आणि डेस्कटॉप या तीन स्वरूपात ते इन्स्टॉल करता येते.
सौजन्य...: टेक् वार्ता