या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Sunday, July 16, 2017

कन्व्हर्टीबल लॅपटॉप


एचपी कंपनीने भारतात पॅव्हिलॉन एक्स ३६० आणि स्पेक्ट्रे एक्स ३६० हे दोन कन्व्हर्टीबल लॅपटॉप भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहेत.
एचपीचे पॅव्हिलॉन एक्स ३६० आणि स्पेक्ट्रे एक्स ३६० हे दोन्ही मॉडेल कन्व्हर्टीबल या प्रकारातील असल्यामुळे अर्थातच ते लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारांमध्ये वापरता येणार आहेत. विद्यार्थी आणि प्रोफेशनल्सला प्रॉडक्टिव्हिटीचे विविध टुल्स प्रदान करणार्‍या या दोन्ही मॉडेलमध्ये इंटेलचा अत्यंत गतीमान असा कोअर आय-७ प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याचे डिझाईन अत्यंत सुबक आणि स्लीम असे आहे. यासोबत विंडोज इंकयुक्त एचपी अ‍ॅक्टीव्ह हा स्टायलस पेन देण्यात आला आहे. तर त्यांच्या सर्व व्हेरियंटमध्ये फुल एचडी क्षमतेचा टचस्क्रीन आयपीएस डिस्प्ले असेल.
एचपी पॅव्हिलॉन एक्स ३६० :- या मॉडेलचे ११.६ इंच डिस्प्लेचे व्हेरियंट ४०,२९० रूपयात; १४ इंची ५५२९० तर १३ इंची १,१५,२९० रूपयात ग्राहकांना खरेदी करता येईल. यात ४ जीबी एनव्हीडिया ग्राफीक्स कार्ड देण्यात आलेले आहे. याच्या विविध व्हेरियंटमध्ये आठ ते १६ जीबीपर्यंत रॅम तर एक टिबी इतके स्टोअरेज असेल. यासोबत ब्लॅकलीट कि-बोर्ड देण्यात आला आहे. एचपीच्या ऑडिओ बुस्ट तंत्रज्ञानासह यात बँग आणि ऑलुफसेन या कंपन्यांचे स्पीकर प्रदान करण्यात आले आहेत. यात फास्ट चार्जींगयुक्त उत्तम दर्जाची बॅटरी देण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे दहा तासांपर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे.
एचपी स्पेक्ट्रे एक्स ३६०:- गत वर्षी लाँच करण्यात आलेल्या स्पेक्ट्रे १३ या मॉडेलची ही कन्व्हर्टीबल आवृत्ती असल्याचे मानले जात आहे. याचे वजन अवघे १.३ किलो इतके असून हे मॉडेल अतिशय स्लीम असे आहे. यात १३.३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असेल. याची रॅम १६ जीबी तर स्टोअरेज ५१२ जीबी इतके असेल. फास्ट चार्जींग तंत्रज्ञानाने सज्ज असणारी यातील बॅटरी ही १२ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यासोबत एचपी इमेजपॅडही तसेच एचपीच्या ऑडिओ बुस्ट तंत्रज्ञानासह यात बँग आणि ऑलुफसेन या कंपन्यांचे स्पीकर प्रदान करण्यात आले आहेत. याच्या विविध व्हेरियंटचे मूल्य १,१५,२९० रूपयांपासून सुरू होणारे आहे.