स्मार्टफोनमधील सेंसर्स दर्शवणारा अनुप्रयोग
आपल्या स्मार्टफोनमध्ये कोणकोणते सेंसर्स आहेत? ते आपणास एका अनुप्रयोगाच्या (Application) सहाय्याने अगदी सहजतेने समजू शकते. त्या अनुप्रयोगाचे नावच Sensors असे असून गूगल प्ले स्टोअरमधून आपणास तो मोफत उतरवता (Donwload) येईल. Sensors आपल्या स्मार्टफोनवर उतरवून स्थापित (Install) करा आणि उघडा.
सेंसर्सचा उपयोग काय?
या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी मी आपल्याला दोन सोपी उदाहरणे देतो. Auto Brightness या वैशिष्ट्यामुळे प्रकाशाच्या तिव्रतेनुसार आपल्या स्मार्टफोनचा ब्राईटनेस आपोआप कमी-जास्त होतो. म्हणजेच दुपारच्या उन्हात आपल्या स्मार्टफोनचा ब्राईटनेस हा आपोआप वाढतो, तर रात्रिच्या अंधारात तो आपोआप कमी होतो. पण मुळात आपल्या स्मार्टफोनला दुपार आणि रात्र यातील फरक कसा समजतो? तर तो त्यामध्ये उपलब्ध असलेल्या Light सेंसरमुळे!आता समजा आपल्याला एखादा कॉल आला! आपण तो कॉल उचलून जेंव्हा स्मार्टफोन कानाला लावतो, तेंव्हा आपल्या स्मार्टफोनची स्क्रिन पूर्णतः विझते. आता आपल्या स्मार्टफोनला कसे समजते की, आपण आपला फोन कानाला लावला आहे? तर ते त्यास Proximity सेंसरमुळे समजते. एखादा कॉल आल्यानंतर आपण तो उचलला आणि आपला हात स्क्रिनच्या जवळ नेला, तरी देखील Proximity सेंसरमुळे आपल्या स्मार्टफोनची स्क्रिन विझेल. कारण एखादी गोष्ट स्क्रिनच्या किती जवळ आहे? हे त्या सेंसरमुळे आपल्या स्मार्टफोनला समजते.