गेल्या काही वर्षामध्ये देशात मोबाइल सेवेचा झपाट्याने प्रसार झाला आहे. मोबाइलच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्यामुळे मोबाइल खरेदीमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. याचबरोबर मोबाइल सेवा पुरवठादार नवनवीन कंपन्याही येत आहे. यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये देशातील मोबाइलधारकांची संख्या एक अब्जाचा टप्पा पार करणार आहे. परिणामी, यापुढे १० आकडी क्रमांक जाऊन ११ आकड्यांचा मोबाइल क्रमांक बाळगावा लागणार आहे.
मोबाइलधारकांच्या संख्यावाढीचा वेग लक्षात घेता पुढच्या वर्षापर्यंत देशातील मोबाइल क्रमांकांची १० आकडी मालिका संपण्याची शक्यता सेल्युलर ऑपरेटर असोसिएशनने (सीओएआय) व्यक्त केली आहे.
सध्या सर्वच मोबाइल सेवा देणा-या कंपन्यांकडून नवे मोबाइल क्रमांक दिले जात आहेत. यामध्ये ९६, ९७, ९८ आणि ९९ या क्रमांकांची काही कंपन्यांकडून दिले जात आहेत. मात्र येत्या वर्षभरात ही मालिका संपण्याची शक्यता सीओएआयने व्यक्त केली आहे. लवकरच देशातील मोबाइलधारकांची संख्या एक अब्जावर जाईल. ज्यामुळे १० आकड्यांचा नवीन क्रमांक देणे अशक्य होईल, असे सीओएआयचे संचालक राजन मॅथ्युज यांनी सांगितले. सध्या काही ऑपरेटरना मोबाइल क्रमाकांची टंचाई भासत आहे.
दूरसंपर्क खात्याला याबाबत गांभीर्याने विचार करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर उपाय म्हणून यापुढे ११ आकड्यांचा नवीन मोबाइल क्रमाकांची मालिका सुरू करण्याची गरज भासणार आहे. दूरसंपर्क आयोगाकडून याबाबत पर्याय शोधला जात आहे. यामध्ये जे क्रमांक वापरले जात नाही, अशा क्रमांकांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ज्यामुळे लँडलाइनमधील कोट्यवधी क्रमांक मोबाइलसाठी वापरता येऊ शकतील, असे मॅथ्युज यांनी सांगितले. ज्यामुळे क्रमाकांचा तुटवडा आणखी पाच ते सहा महिने दूर होईल. तर कदाचित पुढच्या वर्षात आपल्या मोबाइल क्रमांक १२ आकड्यांचाही पाहण्यास मिळेल, असेही त्यांनी सांगितले. सध्या देशामध्ये मोबाइल ऑपरेटर्सना त्यांच्या ग्राहक संख्येवरून मोबाइल क्रमांकाची नवीन मालिका दिली जात आहे.