या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Tuesday, July 4, 2017

बँकेत जाण्याची गरज नाही

बँकेचे व्यवहार आता कधी नव्हेत एवढे सोपे झाले आहेत. ही सहजता आणली आहे, आधुनिक तंत्रज्ञानाने. ज्याला पैसे पाठवायचे आहेत ती व्यक्ती अगदी शेजारच्या इमारतीत राहणारी असो वा सातासमुद्रापार, व्यवहार काहीशे रुपयांचा असो वा लाखोंची उलाढाल. घरबसल्या काम होते. बँकेत जाण्याची गरज जवळपास शून्य झाली आहे. रोख व्यवहारांसाठीचे पर्याय जाणून घेऊया..
‘आधार’च्या साहाय्याने व्यवहार – तुमचे बँक खाते एकदा का आधार कार्डशी संलग्न झाले की तुम्ही आधार कार्डच्या साहाय्याने आर्थिक व्यवहार करू शकता. फक्त त्यासाठी ज्याच्याशी व्यवहार करायचा आहे, त्याचे खातेही आधारसंलग्न असायला हवे. ज्याला पैसे पाठवायचे आहेत, ती व्यक्ती तुमचा आधार क्रमांक आणि रक्कम नमूद करते. तुमच्या बोटांचे ठसे देऊन व्यवहार अधिकृत असल्याची खात्री पटवली की नमूद केलेली रक्कम तुमच्या खात्यावरून वजा होईल आणि संबंधित व्यक्तीच्या खात्यात जमा होईल.
भारत क्यूआर कोड – हा पैसे भरण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. स्मार्ट फोनच्या साहाय्याने क्यूआर कोड स्कॅन करून पैसे भरता येतात. त्यासाठी केवळ तुमचे खाते ज्या बँकेत आहे, त्या बँकेचे अ‍ॅप डाउनलोड करून ठेवावे लागते. त्याच्या साहाय्याने एक व्हच्र्युअल कार्ड तयार केले की ते स्कॅन करून वापर सुरू करता येतो.
मायक्रो एटीएम – हे छोटय़ा स्वरूपातील एटीएम असते. ते एखाद्या सामान्य पॉइंट ऑफ सेल (पीओएस)प्रमाणे दिसते आणि डेबिट कार्डच्या साहाय्याने पैसे काढण्यासाठी वापरता येते. ज्यांना आपल्या ग्राहकांची संख्या वाढवायची आहे, असे विक्रेते या सेवेचा वापर करू शकतात.
‘यूपीआय’ – ‘अनआयडेंटिफाइड युझर इंटरफेस’ हा स्मार्टफोनच्या साहाय्याने व्यवहार करण्याचा डिजिटल पर्याय आहे. तुम्ही फक्त ‘यूपीआय’ अ‍ॅप डाउनलोड करा आणि त्यात तुमच्या बँक खाते क्रमांकाची नोंदणी करा. त्यानंतर ‘एमपिन’ मिळवून त्या साहाय्याने सर्व व्यवहार करू शकता. त्यासाठी तुम्हाला ज्या व्यक्तीशी व्यवहार करायचा आहे, त्यांचा ‘यूपीआय आयडी’ तुम्हाला मिळवावा लागेल.
नेट बँकिंग/ मोबाइल बँकिंग – ही तुमची ‘व्हच्र्युअल बँक’ आहे. तुम्हाला फक्त बँकेच्या ई-बँकिंग सुविधेसाठी नोंदणी करावी लागेल. त्यानंतर युझर आयडी आणि पासवर्ड वापरून ताबडतोब आयएमपीएस, एनईएफटी आणि आरटीजीएसचे व्यवहार करता येतात.
‘एम वॉलेट्स’ – हा पर्याय बँक आणि बँकेतर व्यासपीठांवर वापरता येतो. नावाप्रमाणेच हे तुमच्या स्मार्टफोनमधील डिजिटल वॉलेट आहे. तुम्ही केवळ नोंदणीकृत मोबाइल क्रमांक वापरून अ‍ॅप डाउनलोड करा आणि ते तुमच्या बँक खात्याशी जोडून घ्या. त्यानंतर वॉलेट रिचार्ज करून ते पैसे तुम्ही बिले भरण्यासाठी किंवा खरेदीसाठी वापरू शकता.
एसएमएस आधारित व्यवहार – ज्यांच्याकडून रक्कम स्वीकारायची आहे, त्यांना केवळ पेमेंट लिंकचा संदेश पाठवून रक्कम मिळवता येते. त्यासाठी ज्या कंपन्या ही सेवा देतात त्यांच्याकडे नोंदणी करावी लागते. संदेशात नमूद केलेल्या लिंकमधील माहितीच्या आधारे ग्राहक यूपीआय, नेट बँकिंग, एम-वॉलेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या साहाय्याने रक्कम व्यावसायिकाच्या खात्यात जमा करू शकतो.
– दीपक भुतरा