या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Friday, February 3, 2017

'भीम' अॅप लवकरच 'आधार'शी संलग्न, यूजर्ससाठी नवं फीचर


सरकारनं डिजिटल इंडियासाठी नुकतंच सुरु केलेलं ‘भीम’ अॅप आता ‘आधार’शी जोडण्यात आलं आहे. म्हणजेच आता भीम अॅप यूजर्स आपला 12 डिजिट आधार कार्डचा नंबर वापरून डिजिटल व्यवहार करु शकतात. याशिवाय येत्या काही दिवसात सरकार ‘आधार पे’ देखील लाँच करणार आहे.

आधार पे द्वारे बायोमेट्रिक पद्धतीनं तुम्ही व्यवहार करु शकता. हे फिचर लवकरच सुरु होणार आहे. ज्यामुळे व्हेरिफिकेशन आणि ओटीपीचीही गरज पडणार नाही. दरम्यान 14 बँकांनी आधार पे द्वारे व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. लवकरच इतर बँकाही ही सुविधा सुरु करेल.

एका रिपोर्टनुसार, 100 कोटीहून अधिक लोकांकडे आधारकार्ड आहे. तर 39 कोटी लोकांची बँक खाती आधार नंबरशी लिंक करण्यात आले आहेत. आधार पे आल्यानंतर भीम अॅपच्या साह्य्याने पेमेंट करणं अजून सोपं होणार आहे. त्यावेळी फक्त आधार नंबर आणि बायोमेट्रिक तंत्रज्ञानाच्या आधारे व्यवहार करता येतील.

काय आहे ‘आधार पे’?

आधार पे सर्व्हिसच्या आधारे आधार नंबर आणि बायोमेट्रिक तंत्रज्ञानाने थेट पेमेंट करता येणार आहे. जर तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली आणि त्यासाठी तुम्हाला जर डिजिटल पेमेंट करायचं असेल तर तुम्ही आधार पे वापरू शकतात. म्हणजेच तुम्हाला यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरण्याची गरज नाही. फक्त तुमचा आधारकार्डचा नंबर सांगून बायोमेट्रिकचा (बायोमेट्रिक मशीनवर हाताच्या अंगठ्याचं निशाण) वापर करुन तुमचं डिजिटल पेमेंट करता येणार आहे. पण यासाठी तुमचं बँक खातं आधारकार्डशी लिंक असणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार नाही.