मनाला ताजेतवाने करणारे आणि बुद्धीला चालना देणारे खेळ खेळावे तेवढे कमी आहेत. एकाच आकाराच्या बऱ्याचशा काडय़ा वापरून त्यापासून विविध आकार बनवणे आणि अंक बनवणे हा लहान थोरांच्या आवडीचा जुना खेळ आहे. यासाठी एकाच लांबीच्या काडय़ा मिळण्याची सर्वात सुलभ जागा म्हणजे आगपेटी. यातील पहिली पायरी म्हणजे एका विशिष्ट संख्येने काडय़ा घेऊन सांगितलेला आकार बनवून दाखवणे. परंतु यापेक्षा आणखी मनोरंजक प्रकार म्हणजे अशाप्रकारे बनवलेल्या आकारातील फक्त दोन-तीन काडय़ांची जागा बदलून दुसरा अपेक्षित आकार बनवणे. ह्यसारखी कोडी आपण अनेक वेळा खेळतोच. हाच खेळ आता आपल्याला स्मार्ट फोनवरील Puzzles with matches (https://play.google.com/store/apps/detailsAGid=com.celticspear.matches&hl=en ) ह्य अॅपद्वारे खेळता येणार आहे. यामधे आकार (शेप्स) आणि संख्या (नंबर्स) असे दोन प्रकारचे खेळ आहेत. आकार या भागात दिडशेहून अधिक आणि संख्या या भागात चारशे पझल्स आहेत. ही कोडी सोप्यापासून सुरुवात होऊन कठीण होत जातात. ही क्रमानेच सोडवत जायची आहेत. (उदाहरणार्थ, पहिली १० सोडवून झाल्यावर एकदम ५० व्या कोडय़ावर उडी घेता येणार नाही!)
आकार या भागात प्रत्येक लेव्हलच्या स्क्रीनवर त्रिकोण किंवा चौकोन या आकारांचा उपयोग करून तयार केलेला एखादा आकार दर्शवला जातो आणि एक लक्ष्य समोर ठेवले जाते ज्यामधे तुम्हाला काही काडय़ा काढून किंवा त्याची जागा बदलून एक ठरावीक आकार मिळवायचा असतो.
उदाहरणार्थ, समजा स्क्रीनवर आपल्याला २० काडय़ांच्या साहाय्याने तयार केलेले एकाच मापाचे पाच चौरस दिसत आहेत. त्यापैकी कुठल्याही तीनच काडय़ा हलवून एकाच मापाचे सात चौकोन तयार करायचे आहेत. या पझल्ससाठी एक ठरावीक असे उत्तर नाही. (एकापेक्षा जास्त पद्धतीने हे कोडे सोडवता येऊ शकते.) येथे पझल रिसेट करण्याची सोय आहे.
तर, संख्या या भागात आपल्यासमोर समीकरण ठेवले जाते. उदाहरणार्थ ५+५ = ८. अर्थातच हे समीकरण बरोबर नाही. आता हे आपल्याला दुरुस्त करायचे आहे. त्यासाठी केवळ एकच काडी हलवण्याची मुभा आहे. वरील समीकरणातील दोन पाचांपैकी कुठल्याही एका पाचातील एका काडीची जागा बदलून त्याचा ३ हा आकडा बनवला, तर आपले लक्ष्य साध्य होईल. म्हणजेच आपले समीकरण दुरुस्त होईल. पझल सोडवताना अडचण आल्यास हिंटची मदत घेता येते.
याच प्रकारातील दुसरे अॅप (https://play.google.com/store/apps/detailsAGid=com.klabjan.movethematchespuzzles&hl=en) या लिंकवर उपलब्ध आहे. वरवर बघता अगदी साधासोपा, परंतु प्रत्येक पझल विचार करून सोडवायला लागणारा हा खेळ आहे.
मनाली रानडे – manaliranade84@gmail.com