या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Monday, May 9, 2016

मोबाईलची मिथकं

गेमिंग असू दे किंवा सर्फिग, चॅटिंग असू दे किंवा अन्य कोणतीही कामं.. आजकाल अशी काम मोबाईलवरच सर्रास होताना दिसतात; पण मोबाईल वापरताना तो किती वेळ चार्जिग करावा किंवा चार्जिगला लावला असताना त्याचा वापर करू नये असे कितीतरी समज-गैरसमज असतात. मोबाईलच्या अशा समजुतींविषयी थोडक्यात जाणून घेऊया.
mobileमोबाईलचा उपयोग केवळ एकमेकांशी संपर्क साधणे इतकाच राहिलेला नसून तर त्याहीपुढे गेलेला आहे. स्मार्ट फोन बाजारात दाखल झाल्यावर फोनची गरज आश्चर्यकारकरीत्या वाढलेली दिसून येते. मोबाईलवरून होणारी कित्येक कामं आपल्याला मोबाईल जवळ ठेवण्यासाठी कारणीभूत ठरत असतं. तुम्ही तुमच्या आसपास कित्येक लोकांना पाहिलं असेल जे तासन् तास मोबाईलमध्ये मग्न झालेले दिसतात. एक तर मोबाईलवर बोलत तरी असतात किंवा मग चॅटिंग, सर्फिग, गेमिंग किंवा अन्य कोणत्याही कामासाठी मोबाईलचा वापर करतात. असा मोबाईलचा सतत वापर करणा-या लोकांच्या मोबाईलची बॅटरी सतत संपते किंवा डिस्चार्ज होत असते. कित्येक लोकांचा तर थोडा वेळ जरी मोबाईल वापरला तरी बॅटरी उतरते. म्हणूनच मोबाईलबरोबरच त्याचा चार्जर नेहमीच सोबत ठेवावा लागतो. किंवा चार्जर बाळगणे कोणाला आवडत नसेल तर घर किंवा ऑफिस अशा दोन्ही ठिकाणी आपण आपल्या मोबाईलसाठी चार्जर ठेवून देतो. असं केलं तरी मोबाईल सतत चार्ज करावा लागतो आणि कधी कधी तर असं देखील होतं की मोबाईल चार्जिगला लावल्यानंतरही आपल्याला त्याचा वापर करावा लागतो. खरं म्हणजे मोबाईल चार्ज करताना त्याचा वापर करू नये, कारण असं करणं अतिशय धोकादायक आहे, असं वारंवार आपल्याला सांगितलं जातं; पण त्याकडे आपण सर्रास दुर्लक्ष करतो. कारण चार्जिग होताना मोबाईलचं रेडिएशन एक हजार पटीने वाढलेलं असतं. त्यामुळे केवळ बॅटरीच नाही तर आपल्यालाही धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोबाईलच्या संदर्भात केवळ हे एकच नव्हे तर अशी अनेक मिथकं आहेत. जी आपण आता खरी समजू लागलो आहोत. खरं म्हणजे या मिथकांच्या मागे वैज्ञानिकदृष्टय़ा कोणतंही ठोस कारण सापडलेलं नाही. मोबाईलच्या संदर्भातली अशीच काही अनेक मिथकं आहेत ज्यामुळे लोकांच्या मनात मोबाईलविषयी गैरसमज निर्माण झाला आहे. अशाच काही मिथकांचा विचार आपण आज करणार आहोत.,
दुस-या कंपनी किंवा ब्रँडच्या मोबाईलचे चॅर्जर वापरल्याने मोबाईलची बॅटरी खराब होते :
दुस-या कंपनीचं किंवा दुस-या ब्रँडचं चार्जर वापरल्याने मोबाईलच्या बॅटरीला कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही; पण तुम्हाला याकडे लक्ष दिलं पाहिजे की मोबाईलचा चार्जर कोणत्याही कंपनीची नक्कल असता कामा नये म्हणजेच एखाद्या ब्रँडच्या कंपनीच्या नावात फेरफार करून तयार केलेला नसावा. अशा चार्जरने तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज करू नका. संशोधनानुसार असं सिद्ध झालं आहे की, ब्रँडेड कंपनीचा चार्जरच तुमच्या मोबाईलसाठी अतिशय उपयुक्त आहे.
मोबाईल चार्ज करताना त्याचा वापर करू नये :
मोबाईल चार्ज होत असताना त्याचा वापर तुम्ही आरामात करू शकता. मोबाईल चार्ज करताना त्याचा उपयोग न करण्याची सुरुवात एका घटनेने झाली होती. ही घटना २०१३ मध्ये चीनच्या एका फ्लाइट अटेंडंटसोबत झाली होती. झालं असं की त्यांचा मोबाईल आयफोन-४ हा त्यांनी चार्जिगला लावला असताना तो फुटला. या घटनेमुळे ही गोष्ट लक्षात आली की मोबाईलला जो चार्जर लावण्यात आला होता तो त्या कंपनीचा ब्रँडेड चार्जर नव्हता तर थर्ड पार्टीचा चार्जर होता. खरं म्हणजे तुम्ही तुमचा मोबाईल त्याच कंपनीच्या चार्जरसोबत चार्जिग करत असता तेव्हा तो मोबाईल पूर्णत: सुरक्षित असतो.
मोबाईल रात्रभर चार्जिग केल्यामुळे मोबाईलची बॅटरी खराब होते :
तुमचा फोन खरोखरंच स्मार्ट फोन आहे. केवळ अन्य कामासाठी होणा-या त्याच्या उपयोगामुळे नाही तर चार्जिग होतानादेखील तो आपली स्मार्टगिरी दाखवत असतो. एकदा याची चार्जिग पूर्ण झाली की तो स्वत:च चार्ज होणं किंवा बॅटरी चार्जिग करणं थांबवतो. कारण तेव्हा बॅटरी पूर्ण चार्ज झालेली असते. तुम्ही एखादवेळी रात्रभर चार्ज केला तरी चालेल मात्र दररोजच रात्रीच्या वेळी चार्ज करू नका. शक्यतो तुमचा फोन ४० ते ८० टक्केच चार्ज राहील याकडे लक्ष द्या. जेणेकरून तुमच्या बॅटरीचं आयुष्य वाढेल.
तुम्ही तुमचा फोन केवळ सुरूच ठेवला पाहिजे :
भलेही तुमचा मोबाईल एक मशीन आहे; पण त्यालादेखील थोडय़ा ब्रेकची गरज असते. एका विशेषज्ञाच्या मते, तुम्ही तुमचा मोबाईल काही काळाने बंद केला पाहिजे. विशेषत: तुम्ही जेव्हा झोपायला जाता तेव्हा तुम्ही तुमचा फोन स्वीच ऑफ ठेवला तर बरं होईल. पण हे जर शक्य नसेल तर आठवडय़ातून किमान एकदा तरी काही वेळ तुम्ही तुमचा मोबाईल बंद ठेवणं आवश्यक आहे. असं केल्यानेही तुमच्या फोनच्या बॅटरीचं आयुष्य वाढेल.
मोबाईलची बॅटरी शून्य टक्क्यांवर आल्यावरच तुम्ही बॅटरी चार्ज करायला हवी
आपल्या फोनसाठी थोडय़ा थोडय़ा वेळाने केली जाणारी चार्जिग अधिक लाभदायक ठरते. त्यामुळे त्याची बॅटरी संपूर्ण संपेपर्यंत वाट बघण्याची गरज नाही. ब्रँडेड कंपनीच्या मोबाईलची बॅटरी लिथियम आयर्नपासून तयार केलेली असते. अशा वेळी तुम्ही शून्य टक्क्यांपर्यंत बॅटरी उतरण्याची वाट पाहत बसाल तर मोबाईलची बॅटरी अनस्टेबल होते. त्यामुळे तुमचा मोबाईल एका ठरावीक टक्क्यांपर्यंतच चार्ज करण्याची सवय होते. आणि पुन:पुन्हा शून्यापासून सुरुवात केल्याने त्या काही ठरावीक क्रमांकाच्या टक्क्यांमधले एकेक आकडे कमी कमी होत जातात.
सगळ्यात विशेष महत्त्वाचं म्हणजे, याचा शोध वैज्ञानिकांनी लावला आहे, तो म्हणजे तुमच्या फोनच्या बॅटरीला उष्णतेपासून अधिक धोका होण्याची शक्यता अधिक आहे. कारण बॅटरी लिथियम आयर्नपासून बनली असल्यामुळे ती आपसुकच गरम होते. त्यामुळे चार्जिग होताना बॅटरीचं तापमान अधिकच वाढतं. त्याचप्रमाणे अधिक थंडीदेखील बॅटरीला नुकसान पोहोचवते. म्हणूनच शक्य असेल तेवढं त्या त्या कंपनीने दिलेल्या सूचनांचं पालन करा आणि आपल्या मोबाईलचा वापर अधिक सुरक्षित पद्धतीने करा. मोबाईल विकत घेताना आपल्याला हे उपकरण कसं वापरावं, याची माहिती मोबाईलच्या संबंधित कंपनीने दिलेल्या पुस्तकात असते. ती काळजीपूर्वक वाचून त्यानुसार हे मोबाईल नावाचं उपकरण वापरलं तर आपल्या रोजच्या जगण्यातला हा सोबती जास्तीत जास्त काळ आपली सोबत देईल.